The Small Catechism

Printable PDF goes here

लहान कॅटेकिझम

मार्टिन लुथर

विषय 

निवेदन

प्रस्तावना 

I.           दहा आज्ञा

II.          नितीसुत्रे

III.         प्रभूच्या प्रार्थना 

IV.           बाप्तिस्मा

V.           कबुलीजबाब

VI.           प्रभूचे रात्रीचे भोजन 

दैनंदिन प्रार्थना 

कर्तव्यांची सारणी

उपोद्घात/ निवेदन

प्रत्येक चर्चला, प्रत्येक प्रमुख धर्मोपदेशकाला, आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला (कॅटेकिझम)प्रश्नोत्तराच्या मार्गाने शिक्षण मिळवणे आवश्यक आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सारख्या लोकांना आपण कशावर विश्वास ठेवतो आणि याचे स्पष्टीकरण कसे करावे हे माहित असले पाहिजे. बायबलने आपल्याला दिलेल्या निर्देशांनुसार, आपल्याकडे विचारणा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातील आशा समजावून सांगण्यास आपण तयार असले पाहिजे (1 पीटर 3:15). प्रमुख धर्मोपदेशकापासून लहान मुलांपर्यंत, सर्व ख्रिस्तींमध्ये ख्रिस्ती शिकवणुकीच्या मुलभूत तत्वांच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मार्टिन लुथर यांनी उत्कृष्ट रीतीने ह्या लहान कॅटेकिझमची रचना केलेली आहे. 

दहा आज्ञा आपल्याला ख्रिस्ती म्हणून कसे जगावे हे शिकवतात, आणि त्या आपले अपयश दाखवून आपला तारणहार ख्रिस्त याची आपल्याला आवश्यकता का आहे हे दर्शवतात. ही नितीसुत्रे आपल्याला पिता ईश्वर, पुत्र, आणि पवित्र आत्मा यांच्याबद्दल; ईश्वराने काय केले आहे आणि काय करत आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे याबद्दल शिकवण देतो. आपल्या प्रभुने जसे त्यांच्या शिष्यांना शिकवले त्याचप्रमाणे प्रभूच्या प्रार्थना आपल्याला प्रार्थना कशी करावी हे शिकवतात. बाप्तिस्मा, पापांची कबुली, आणि प्रभूच्या रात्रीच्या जेवणाबद्दलचे कॅटेकिझम मधील भाग प्रभू कृपा करून आपल्याला कशाप्रकारे क्षमा करतात हे शिकवतात. तसेच, लुथर यांच्या सकाळ व संध्याकाळच्या प्रार्थना, आणि कर्तव्यांचे कोष्टक, जीवनाच्या विविध टप्प्यांसाठी बायबलमधील परिच्छेदांचे संकलन, ईश्वराला संतुष्ट करेल अशाप्रकारे आपण कसे जगावे याविषयी मौल्यवान मार्गदर्शन देतात.    

आपण कॅटेकिझमचा वापर कसा केला पाहिजे? हे देखील मार्टिन लुथर स्पष्टपणे शिकवतात. प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुखाने आपल्या बायकोला, मुलांना, आणि नोकरांना शिकवले पाहिजे. प्रत्येक धार्मिक सभेमध्ये, प्रमुख धर्मोपदेशकाने लोकांना हे शिकवले पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने कॅटेकिझमची वचने लक्षात ठेवली पाहिजे, कथन केली पाहिजेत आणि कबुलीजबाब दिली पाहिजे. लहान कॅटेकिझमची शिकवणूक मुलभूत असली तरीही ह्या जीवनदायी शब्दांची आठवण आपल्याला बरेचदा होत नाही. 

मार्टिन लुथर यांनी जेव्हा धार्मिक सभांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तेव्हा त्यांना या काळात कॅटेकिझमची अत्यंत गरज भासली. आपल्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ह्या भेटींवरील आपल्या निरीक्षणाबद्दल लिहिले: ‘सामान्य माणसाला, विशेषतः खेड्यामध्ये राहणाऱ्या, ख्रिस्ती तत्वप्रणाली विषयी व्यावहारिकदृष्ट्या काहीच माहिती नसते, आणि बरेच धर्मोपदेशक शिकवण देण्यास जवळपास पूर्णपणे अक्षम आणि  असमर्थ असतात. तरीसुद्धा, सर्व ख्रिस्ती लोकांना प्रभूच्या प्रार्थना, नितीसुत्रे आणि दहा आज्ञा माहित नसल्या तरीही ते बाप्तिस्मा घेत आहेत आणि पवित्र संस्कार प्राप्त करत आहेत. कॅटेकिझम शिवाय चर्च नक्कीच अश्या शोचनीय स्थितीमध्ये जाईल. ईश्वराच्या कृपेने असे घडू नये!

प्रत्यक्षात, कोणतीही अतिशयोक्ती न करता किंवा कोणतीही शंका न बाळगता, मी हे खरोखर सांगू शकतो की आपल्या धार्मिक सभांमध्ये आणि आपल्या घरामध्ये जर कॅटेकिझमचे ज्ञान असेल आणि त्याचे अनुसरण केले जात असेल तर आपल्याला कलह, ईर्ष्या किंवा फूट पडण्याचे कोणतेही कारण क्वचितच आढळेल, आणि या अंधकारमय जगात आपले चर्च दिव्य तेजाने तेजोमय होईल, जेणेकरून सर्व लोक याच्या प्रेमळपणाकडे व समाधानाकडे आकर्षित होतील. ईश्वर आमच्याकडून अशी चांगली कार्ये करून घेवो!    

म्हणून, सर्व ख्रिस्ती लोकांच्या, आणि विशेषतः लुथर यांच्या माझ्या सहअनुयायांच्या फायद्यासाठी, लहान कॅटेकिझमची ही आवृत्ती प्रकाशित करण्यास मला फार आनंद होत आहे. मला आशा आहे की त्यांना हा अनुवाद विश्वासार्ह, स्पष्ट, समजण्यास सोपा, आणि निरंतर आध्यात्मिक प्रगतीचा स्त्रोत जाणवेल. ईश्वराच्या कृपेमुळे, ख्रिस्ताचा प्रकाश वर्तमान युगातील अंधारात देखील चमकू शकेल. असेच होवो अशी आपण प्रार्थना करूया. 

एडवर्ड आर्थर नॉमन

एलसीएमएस थिओलॉजिकल एज्युकेटर, साउथ एशिया

डॉ. मार्टिन लुथर यांची प्रस्तावना

सर्व विश्वासू, पवित्र प्रमुख धर्मोपदेशक आणि उपदेशक यांना मार्टिन लुथर यांच्यातर्फे आपले प्रभू, येशू ख्रिस्त यांची कृपा, दया आणि शांतीप्राप्त होवो.

मी नुकत्याच दिलेल्या भेटींमध्ये मला जी शोचनीय, दयनीय परिस्थिती आढळली, त्या परिस्थितीने मला ह्या कॅटेकिझम, किंवा ख्रिस्ती तत्वप्रणालीला लहान, साध्या व सोप्या स्वरुपात निर्माण करण्यास आणि प्रकाशित करण्यास भाग पाडले आणि उद्युक्त केले. हे प्रिय सर्वशक्तिमान ईश्वरा, मला मदत करा! मी तिथे अत्यंत भयानक आपत्ती पहिली आहे. सामान्य लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना, ख्रिस्ती तत्वज्ञानाविषयी काहीही ज्ञान नाही, आणि दुर्दैवाने, आणि बरेच धर्मोपदेशक शिकवण देण्यास जवळपास पूर्णपणे अक्षम आणि असमर्थ असतात. हे खरोखरच लज्जास्पद आहे. आणि तरीसुद्धा, त्या सर्व लोकांना प्रभूच्या प्रार्थना, प्रेषितांची नितीसुत्रे किंवा दहा आज्ञा यांचा अर्थ माहित नसला किंवा पाठ नसला तरीही त्यांना ख्रिस्ती समजले जाते, ते बाप्तिस्मा घेतात आणि आपल्या बरोबरीने पवित्र संस्कारांचा लाभ प्राप्त करतात. थोडक्यात सांगायचे तर, त्यांचे राहणीमान रानटी प्राण्यांपेक्षा फारसे वेगळे नसते; आणि आता जेव्हा त्यांना येशूची शिकवण समजली आहे, तर त्यांनी ख्रिस्तींना मिळणाऱ्या सवलतीचा गैरफायदा घेण्याची कला आत्मसात केली आहे.

हे बिशपांनो, तुम्ही ज्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी ख्रिस्ताने तुमच्यावर सोपवली होती त्या लोकांकडे अत्यंत लाजिरवाण्या रीतीने दुर्लक्ष केल्याबद्दल, त्यांना मार्ग सोडून भटकू दिल्याबद्दल, आणि एकाही क्षणासाठी आपले कर्तव्य न पार पडल्याबद्दल, आणि तुम्ही जी कार्ये करणे आवश्यक होते ती सोडून इतर सर्व कार्ये केल्याबद्दल, तुम्ही ख्रिस्ताला काय उत्तर देणार आहात? तुमचे सर्व दुर्दैव दूर व्हावे – मी आशा करतो की तुमच्या सोबत काहीही वाईट न घडो! तुम्ही केवळ एकाच स्वरूपाच्या धार्मिक संस्काराची आज्ञा देता, आणि आपल्या मानवी परंपरांचा आग्रह धरता, पण असे असताना लोकांना प्रभूची प्रार्थना, मार्ग, दहा आज्ञा, किंवा ईश्वराच्या कोणत्याही वचनाची माहिती आहे किंवा नाही याबद्दल किंचितही परवा करत नाहीत, हे धोरण अत्यंत अश्रद्धपणाचे किंवा उर्मटपणाचे नाही का? धिक्कार, धिक्कार असो तुमचा!

म्हणूनच, मुख्य धर्मोपदेशक आणि उपदेशक असलेल्या आदरणीय महोदय आणि माझ्या प्रिय बंधुजनहो, मी तुम्हाला अत्यंत कळकळीने विनंती करत आहे की, आपल्या कर्तव्यांसाठी स्वतःला मनापासून वाहून घ्या, आपल्यावर ज्यांची जबाबदारी सोपवली आहे त्यांच्यावर दया करा, आणि लोकांच्या, विशेषतः तरुण मुलांच्या मनावर कॅटेकिझम बिंबवण्यास आम्हाला मदत करा. आणि तुमच्यापैकी जे लोक चांगले कार्य करू शकत नाहीत – जर तुमच्यापैकी कोणालाही ह्या बाबतीत काहीही ज्ञान नसल्यामुळे तुमच्याकडे ते कौशल्य नसेल तर – अक्षरशः ही कोष्टके आणि फॉर्म घेऊन खालीलप्रमाणे लोकांच्या मनावर छाप पाडण्यास लाजू नका.

सर्वात प्रथम, उपदेशाकांनी दहा आज्ञा, प्रभूची प्रार्थना, नितीसुत्रे आणि पवित्र संस्कार यांच्यावरील भिन्न आणि विविध लेख व स्वरूप यांना काळजीपूर्वक टाळले पाहिजे, तर केवळ एकच स्वरूप स्वीकारावे ज्याला ते पाठिंबा देतात आणि जे ते वर्षानुवर्षे सतत इतरांच्या मनावर बिंबवतात. परंतु मी हा सल्ला या देत आहे कारण, मला माहित आहेत की तरुण साध्या लोकांना शिकवताना सुनिश्चित व एकसमान लेख आणि स्वरूप स्वीकारले पाहिजे, अन्यथा जर शिक्षकांनी त्यांना आज एका मार्गाने शिकवले आणि दुसऱ्या वर्षी वेगळ्या मार्गाने शिकवले तर ते गोंधळतात कारण ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि अशाप्रकारे त्यांना शिकवण्यासाठी घेतलेले सर्व श्रम व प्रयत्न निरर्थक ठरतात.

आपल्या धन्य फादर्सना हे व्यवस्थितपणे समजले होते; म्हणूनच ते प्रभूची प्रार्थना, नितीसुत्रे आणि दहा आज्ञा यांच्या एकाच स्वरूपाचा वापर करत होते. म्हणूनच आपण सुद्धा त्यांच्या साधनेचे अनुकरण केले पाहिजे आणि तरुण व सध्या लोकांना प्रत्येक वेळी कॅटेकिझम शिकवताना, एकही अक्षर न बदलता हे सर्वकाही शिकवण्यासाठी, अथवा एका वर्षी एक स्वरूप मनावर ठसवून दुसऱ्या वर्षी वेगळे स्वरूप शिकवणे टाळून शिकवण्यासाठी अथक परिश्रम केले पाहिजेत.

म्हणूनच तुम्हाला जे स्वरूप आवडते ते निवडा आणि त्याचे निरंतर अनुसरण करा. परंतु जेव्हा तुम्ही विद्वान आणि बुद्धिमान व्यक्तींना प्रवचन देतात तेव्हा तुम्ही तुमचे कौशल्य दाखवू शकता आणि ह्या भागांना विविध, क्लिष्ट मार्गांनी सादर करू शकतात व तुम्हाला शक्य असेल तितक्या उत्कृष्ट प्रकारे त्यांना सांगू शकता. परंतु तरुण लोकांच्या बाबतीत एकाच निश्चित अश्या स्वरूपाचा व पद्धतीचा अवलंब करा, आणि सर्वात प्रथम त्यांना दहा आज्ञा, मार्ग, प्रभूची प्रार्थना सारख्या इतर गोष्टी शिकवा, जेणेकरून ते देखील ह्या गोष्टी तुमच्याप्रमाणेच पाठ करू शकतील आणि लक्षात ठेवतील.

परंतु जे लोक हे शिकण्यास इच्छुक नाहीत त्यांना हे सांगितले गेले पाहिजे की ते ख्रिस्ताला नाकारत आहेत आणि ते ख्रिस्ती नाहीत, त्यांना पवित्र संस्कारांम्ध्ये सहभागी होऊ देऊ नये, बाप्तिस्माच्या वेळेस त्यांची सहायता घेऊ नये, ख्रिस्तींना मिळणाऱ्या सवलतींचा दिला जाऊ नये; असे समजावे की त्यांनी पोप व त्यांच्या अधिकाऱ्यांकडे पाठ फिरवून प्रत्यक्ष सैतानाची बाजू घेतली आहे. या शिवाय, त्यांच्या पालकांनी व मालकांनी त्यांनी अन्न व पाणी देण्यास मनाई केली पाहिजे, आणि त्यांना असे सूचित केले पाहिजे की राजकुमार अश्या उद्दाम लोकांना त्याच्या देशातून बाहेर हाकलून देईल!

जरी आपण कोणालाही विश्वास ठेवण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही आणि असे करूही नये, पण तरीही आपण लोक ज्या व्यक्तींसोबत राहतात आणि ज्यांच्या सोबत काम करू इच्छितात त्यांच्या बाबतीत काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे समजून घेण्यासाठी लोकांना आग्रह केला पाहिजे आणि उद्युक्त केले पाहिजे. कारण ज्याला शहरात राहायचे आहे त्या शहराच्या कायद्यांचे संरक्षण प्राप्त करण्याकरता त्याने शहराचे कायदे समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे, भले ही तो विश्वास ठेवणारा असो किंवा गुप्तरित्या व खाजगीरित्या एखादा भामटा आणि कावेबाज असो.

तसेच, धर्मग्रंथामधील लेख व्यवस्थितपणे शिकल्यानंतर, त्यांना त्यांचा अर्थ देखील शिकवा, म्हणजे त्यांना यामागचे कारण समजेल आणि पुन्हा ह्या कोष्टकांचे स्वरूप किंवा तुमच्या आवडीची इतर कोणतीही संक्षिप्त एकसमान पद्धत निवडा आणि त्याचेच अनुसरण करा, लेखाच्या संदर्भात जे काही सांगितले आहे त्यात एकही अक्षर बदलू नका, यासाठी वेळ द्या. कारण तुम्हाला हे सर्व भाग एकाच वेळेस शिकवण्याची काही आवश्यकता नाही तर एका पाठोपाठ एक शिकवण्याची गरज आहे. पहली आज्ञा व्यवस्थितपणे समजल्यानंतरच दुसरी आज्ञा शिकवण्यास सुरवात करा, अन्यथा ते दडपून जातील, कोणतीही शिकवण त्यांना योग्य रित्या पाळता येणार नाही.

त्याचप्रमाणे, तुम्ही त्यांना हे लहान कॅटेकिझम शिकवून झाल्यानंतर, त्यांना मोठे कॅटेकिझम शिकवण्यास सुरवात करा, आणि त्यांना समृद्ध व संपूर्ण ज्ञान देखील द्या. ह्या टप्प्यावर प्रत्येक आज्ञा, लेख, याचिका व भाग यांचे कार्य, उपयोग, फायदे, जोखीम आणि हानी यांच्यासह विस्तारपूर्वक वर्णन करा, जे तुम्हाला या विषयांवरील पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात सापडेल. आणि तरुण लोकांमध्ये ज्या आज्ञेकडे अथवा भागाकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जात आहे त्यावर जास्त भर द्या. उदाहरणार्थ, कामगार आणि व्यापारी, शेतकरी व नोकर यांच्याबाबतीत चोरी संबंधीच्या सातव्या आज्ञेवर जास्त भर दिला पाहिजे कारण या लोकांमध्ये विविध प्रकारचा अप्रामाणिकपणा व चोरी करण्याची वृत्ती जास्त असते. तसेच, लहान मुले व सामान्य लोकांच्या बाबतीत चौथ्या आज्ञेचा जास्त आग्रह धरला पाहिजे की त्यांनी शांत, विश्वासू, आज्ञाधारक आणि शांतताप्रिय असले पाहिजे, आणि तुम्ही बायबल मधील अनेक उदाहरणे देऊन त्यांना समजावले पाहिजे की ईश्वर अश्या लोकांना कशाप्रकारे शिक्षा देतो किंवा आशीर्वाद देतो.

तुम्ही इथे विशेषतः मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी) व पालकांना योग्य रितीने शासन करण्यास व त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास उद्युक्त केले पाहिजे, आणि त्यांना समजावले पाहिजे की असे करणे त्यांचे कर्तव्य का आहे आणि त्यांनी असे न केल्यास ते किती भयंकर पाप करत आहेत. कारण अशाप्रकारे दुर्लक्ष करून ते ईश्वराची सत्ता आणि जगाचे राज्य उलथून टाकण्याचा व नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ईश्वराचा व मानवाचा सर्वात वाईट शत्रू म्हणून कार्य करत आहेत. जर ते मुलांना प्रमुख धर्मोपदेशक, उपदेशक, सचिव किंवा याप्रमाणे इतर काही बनण्याचे प्रशिक्षण देत नसतील तर ते किती भयानक हानी पोहचवत आहेत आणि याबद्दल ईश्वर त्यांना किती भयंकर शिक्षा देईल हे स्पष्ट करून सांगा. अशाप्रकारे उपदेश करणे आवश्यक आहे. खरे पाहता, इतर कोणत्याही विषयाच्या बाबतीत अशाप्रकारे वागण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. सध्या मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी) व पालक या संदर्भात अकल्पनीय असे पाप करत आहेत. आणि अश्याच गोष्टींमुळे सैतान देखील काहीतरी क्रूर बेत आखत आहे.

सरतेशेवटी, पोपची जुलुमी राजवट संपुष्टात आल्या पासून, लोक धार्मिक संस्कारांम्ध्ये भाग घेण्यास फारसे उत्सुक नाहीत, आणि हे ह्या संस्कारांना निरुपयोगी व अनावश्यक म्हणून तुच्छ लेखतात. आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे पण हे देखील समजावले पाहिजे: आपण कोणालाही विश्वास ठेवण्यास, किंवा धार्मिक संस्कारांमध्ये भाग घेण्यास, कोणताही कायदा, वेळ, अथवा जागा बदलण्यास भाग पाडत नाही, तर आपण त्यांना अशाप्रकारे उपदेश करतो की ते स्वच्छेने, आमच्या कोणत्याही कायद्याशिवाय स्वतःहून आग्रह करतात, आपल्या सारख्या प्रमुख धर्मोपदेशकांना संस्कार करण्यास भाग पाडतात. असे घडण्यासाठी त्यांना संगितले जाते: जे येशूच्या शिकवणीवर विश्वास ठेवत नाहीत किंवा ऐकत नाहीत ते ख्रिस्ती नाहीत, त्याचप्रमाणे जो कोणीही वर्षातून चार वेळा धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न किंवा इच्छा करत नाही, ते धार्मिक संस्कारांचा तिरस्कार करतात आणि ख्रिस्ती नाहीत ही भीती बाळगली पाहिजे. कारण ख्रिस्ताने असे संगितले नाही की, ‘हे वगळा’ किंवा ‘हे तुच्छ समजा’, तर त्यांनी हे संगितले की ‘तुम्ही जसे वरचेवर पेय पिता त्याचप्रमाणे हे करा’. सत्य हे आहे की ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता किंवा ह्याला तुच्छ न समजता, हे पूर्ण केले जावे ही त्यांची इच्छा आहे. त्यांनी सांगितले आहे की ‘असे करा!’

जो कोणीही धार्मिक संस्कारांना जास्त महत्व देत नाहीत, ते त्यांच्या कृतीतून दर्शवतात की त्यांच्याकडे पाप नाही, देह नाही, सैतान नाही, जग नाही, मृत्यू नाही, धोका नाही, नर्क नाही; अर्थातच ते अश्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत, परंतु ते ह्या गोष्टींमध्ये पूर्णपणे अडकलेले असतात, ते सैतानाच्या अत्यंत जवळचे असतात. त्याचप्रमाणे, त्यांच्याकडे कोणतीही कृपा, जीवन, नंदनवन, स्वर्ग, ख्रिस्त, ईश्वर किंवा काहीही चांगले नसते. कारण जर त्याला वाटत असेल की त्याच्याकडे इतक्या वाईट गोष्टी आहेत, आणि जे चांगले आहे त्याची त्याला आवशकता आहे तर ज्यामुळे वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होतो आणि इतका चांगलेपणा बहाल केला जातो अशा धार्मिक संस्कारांकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत. कोणत्याही कायद्यानुसार धार्मिक संस्कार करण्याची जबरदस्ती करण्याची काहीही आवश्यकता भासणार नाही, परंतु ते स्वेच्छेने धावत येतील आणि स्वतःहून भाग घेतील व तुम्ही त्यांना धार्मिक संस्कार द्यावा अशी विनवणी करतील.

म्हणूनच तुम्ही पोप प्रमाणे ह्या बाबतीत कोणताही कायदा तयार करू नका. केवळ या धार्मिक संस्कारांचे फायदे आणि तोटे, आवश्यकता आणि उपयोग, धोके आणि लाभ त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडा आणि तुम्ही सक्ती न करता देखील लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील. परंतु जर ते तुमच्याकडे आले नाहीत तर त्यांना जाऊ द्या, आणि त्यांना सांगा की जे लोक दयाळू ईश्वराची आवश्यकता आणि मदत यांना मानत नाहीत असे लोक सैतानाचे सहकारी असतात. परंतु जर तुम्ही त्यांना उद्युक्त केले नाही, किंवा कायदा बनवला नाही किंवा यास निषेध केला नाहीत, तर लोकांनी धार्मिक संस्कारांना तुच्छ लेखणे ही तुमची चूक असेल. जर तुम्ही निवांत आणि शांत असाल तर ते सुस्त नाही बनणार तर काय बनणार? म्हणूनच तुम्ही प्रमुख धर्मोपदेशक व उपदेशाकांनी याकडे लक्ष द्या! पोपच्या सत्तेखाली जसे होते त्यापेक्षा आपले आताचे अधिकार व कर्तव्ये खूपच वेगळी आहेत; आता हे प्रामाणिक व हितकारक झाले आहे. त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये अधिक त्रास आणि श्रम, जोखीम आणि परीक्षा समाविष्ट आहेत, आणि ह्या व्यतिरिक्त, जगात याला फारच कमी मान आणि कृतज्ञता प्राप्त होते. परंतु जर आपण विश्वास ठेवून श्रम केले तर आपल्याला प्रत्यक्ष ख्रिस्ताची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच, सर्वात कृपाळू पित्याने आमची मदत करावी, ज्याची आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने निरंतर स्तुती करतो आणि आभार मानतो! आमेन.

I. दहा आज्ञा 

The Ten Commandments

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना ह्या आज्ञा सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकवल्या पाहिजेत? 

पहिली आज्ञा

माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस. 

तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस – वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस; त्यांची उपासना करू नकोस; किंवा त्यांची सेवा करु नकोस.   

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त ईश्वराची भीती बाळगली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. 

दुसरी आज्ञा 

तू प्रभूचे, आपल्या ईश्वराचे नाव व्यर्थपणे घेऊ नकोस.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण त्याचे नाव घेऊन शाप देऊ नये, शपथ घेऊ नये, जादूटोणा वापरू नये, खोटे बोलू नये किंवा फसवू नये, तर गरज असेल तेव्हा, प्रार्थना करताना, स्तुती करताना, आणि आभार मानताना त्याचे स्मरण करावे.  

तिसरी आज्ञा 

तू शब्बाथ दिवसाला पवित्र दिवस म्हणून पाळ. 

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण उपदेश आणि त्याची वचने यांना तुच्छ लेखू नये, उलट त्यांना पवित्र मानावे, आणि ती आनंदाने ऐकली पाहिजेत आणि शिकली पाहिजेत.

चौथी आज्ञा 

तू तुझ्या आई-वडिलांचा मान राख, जेणेकरून तुझे भले होईल आणि तुला ह्या पृथ्वीतलावर दीर्घायुष्य लाभेल.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या पालकांचा आणि मालकांचा तिरस्कार अथवा राग करू नये, उलट त्यांना सन्मान द्यावा, त्यांची सेवा करावी, आज्ञा पालवी आणि त्यांच्यावर प्रेम करून त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक द्यावी.

पाचवी आज्ञा 

तू कोणाचाही खून करू नकोस.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या शेजाऱ्यांना शारीरिक इजा किंवा दुखापत करू नये, उलट त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवावा, आणि त्याच्या शारीरिक व जीवनविषयक गरजांच्या आणि कसोटीच्या क्षणाला त्यांना मदत केली पाहिजे.

सहावी आज्ञा

तू व्यभिचार करू नकोस. 

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या बोलण्यातून व कृतीतून पवित्र आणि सभ्य आयुष्य जगू शकू; आणि जोडीदारांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.

सातवी आज्ञा

तू चोरी करू नकोस.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या शेजाऱ्यांकडून पैसे किंवा माल घेणार नाही, किंवा आपल्यासाठी त्यांना फसव्या सौद्यामध्ये अथवा लबाडीमध्ये फसवणार नाही, उलट त्यांचा माल आणि व्यवसाय वाढवण्यासाठी व सुधारण्यासाठी त्याला मदत करा, आणि त्याची संपत्ती टिकून राहावी व त्याची स्थिती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करा.

आठवी आज्ञा

तू तुझ्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या शेजाऱ्याविषयी खोटे बोलू नये, जाणूनबुजून असत्य सांगू नये, त्याचा विश्वासघात, बदनामी किंवा निंदा करू नये, उलट त्याचा बचाव करावा, त्याच्याविषयी चांगले बोलावे व चांगला विचार करावा, आणि सर्व काही चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे व त्याचा चांगला अर्थ लावला पाहिजे.

नववी आज्ञा

तू तुझ्या शेजाऱ्याच्या घराची लोभ धरू नकोस.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण धूर्तपणे आपल्या शेजाऱ्याच्या वारसाहक्काची मालमत्ता किंवा घर घेणार नाही, आणि न्याय व कायदेशीर हक्काच्या बहाण्याने स्वतःसाठी घेणार नाही, उलट त्याची संपत्ती शाबूत राखण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे व त्याच्या उपयोगी आले पाहिजे.

दहावी आज्ञा 

तू तुझ्या शेजाऱ्याच्या बायकोची, किंवा त्याच्या नोकराची, किंवा त्याच्या मोलकरीणीची, किंवा त्याच्या बैलाची, गाढवाची, किंवा त्याच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूचा लोभ करू नकोस. 

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

आपण ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला, नोकरांना किंवा गुरांना त्याच्या पासून दूर करणार नाही, त्यांचे अपहरण करणार नाही किंवा त्यांना भुलवून पळवून नेणार नाही, उलट त्यांना तिथेच थांबून काळजीपूर्वक त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास सांगितले पाहिजे.

सारांशामध्ये या सर्व आज्ञांबद्दल ईश्वराने काय संगितले आहे?

उत्तर:

त्याने निर्गम 20:5-6 मध्ये असे सांगितले आहे की:

‘मी परमेश्वर तुमचा देव आहे, मी ईर्ष्यावान देव आहे,जे माझा द्वेष करतात त्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या अपराधाबद्दल मी त्यांना शिक्षा करतो, पण जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांवर दया करतो.’

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

जे कोणीही ह्या आज्ञांच्या मर्यादेचे उल्लंघन करतात आणि अनादर करतात त्या सर्वांना शिक्षा करण्याचा ईश्वर इशारा देतो. म्हणूनच आपण त्याच्या रागाची भीती व भय बाळगले पाहिजे आणि त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध वर्तन नाही केले पाहिजे. परंतु जे लोक ह्या आज्ञा पाळतात त्या सर्वांवर कृपा करण्याचे आणि त्यांना आशीर्वात देण्याचे तो वचन देतो. म्हणूनच आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे, आणि उत्साहाने व मेहनतीने त्याच्या आज्ञेनुसार जीवनाची दिशा आखली पाहिजे.

II. नितीसुत्रे 

The Creed

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हे सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकवले पाहिजे?

निर्मितीचा पहिला लेख

मी स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता, सर्वशक्तिमान देव पित्यावर विश्वास ठेवतो. 

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

माझा विश्वास आहे की ईश्वराने मला आणि सर्व प्राण्यांना निर्माण केले आहे; त्याने मला माझे शरीर आणि आत्मा, डोळे, कान, आणि माझे सर्व अवयव, माझी तर्कशक्ती आणि माझी सर्व इंद्रिये दिली आहेत, आणि अजूनही त्यांचे रक्षण करतो; याशिवाय, त्याने मला कपडे आणि बूट, मांस आणि पेय, घर आणि निवारा, बायको आणि मुळे, शेत, गुरे आणि माझ्या सर्व वस्तू दिल्या आहेत; की तो ह्या शरीराला व आयुष्याला आधार देण्यासाठी मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी विपुल प्रमाणात आणि दररोज देतो; की तो सर्व संकटापासून माझे रक्षण करतो, आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून माझे संरक्षण करतो व मला जपतो; आणि हे सर्व माझ्या कोणत्याही पुण्याई अथवा योग्यतेशिवाय केवळ त्याच्या निर्मळ, पित्यासमान, दैवी चांगुलपणा व कृपाळूपणा मुळे करतो; आणि ह्या सर्व गोष्टींसाठी, मला त्याचे खरोखरच आभार मानले पाहिजेत, स्पष्टपणे त्याची स्तुती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. हे नक्कीच खरे आहे.   

पापमुक्तीचा दुसरा लेख

आणि प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्र, आपला प्रभू; जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मेरीच्या उदरी जन्मास आला, पोंटीयस पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर चढवण्यात आले होते, ज्याच्या मृत्यूनंतर त्याला पुरण्यात आले होते; जो नरकात गेला; आणि तिसऱ्या दिवशी परत उठला; स्वर्गात गेला आणि सर्वशक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे; तेथून तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करेल.  

याचा अर्थ काय आहे?

माझा असा विश्वास आहे की, येशू ख्रिस्त, खरा ईश्वर, अनंतकाळाच्या पित्यापासून जन्माला आलेला, आणि तसेच खरा मनुष्य, जो कुमारी मेरीच्या उदरी जन्माला आला, तो माझा प्रभू आहे, ज्याने माझ्या सारख्या वाट चुकलेल्या, दोषी प्राण्याला पापमुक्त केले आहे आणि सर्व पापांपासून, मृत्यूपासून व सैतानाच्या शक्तीपासून माझी सुटका केली आहे, सोने व चांदी देऊन नव्हे तर आपले पवित्र, मौल्यवान रक्त आणि आपली निरपराध व्यथा व मृत्यू देऊन, म्हणून मी पूर्णपणे त्याचा आहे, आणि त्याच्या अधिपत्याखाली राहून प्रामाणिकपणा, निष्पापपणा आणि परमसुखाने त्याची निरंतर सेवा करेन, ज्याप्रमाणे तो मृत्यूमधून परत आलेला आहे आणि अनंतकाळापर्यंत जगून राज्य करतो. हे नक्कीच खरे आहे.

पवित्रतेचा तिसरा लेख

मी पवित्र आत्म्यावर; पवित्र कॅथलिक चर्च, संतांची सह्भागीता; पापांची क्षमा; शरीराचे पुनरुत्थान; आणि सार्वकालिक जीवन यांच्यावर विश्वास ठेवतो. आमेन.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

माझा असा विश्वास आहे की माझ्या स्वतःच्या कारणामुळे किंवा सामर्थ्याने माझ्या प्रभू येशू ख्रिस्तावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू शकत नाही किंवा त्याच्याकडे येऊ शकत नाही व त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाही; परंतु येशूच्या शिकवणीच्या मार्गाद्वारे पवित्र आत्म्याने मला बोलावले आहे, बक्षिसे देऊन त्याने मला अज्ञानापासून मुक्त केले आहे, आणि पवित्र बनवून मला खऱ्या विश्वासामध्ये आणले आहे. अगदी त्याच प्रकारे, जसे तो पृथ्वीवरील सर्व ख्रिस्ती चर्चना बोलवतो, गोळा करतो, अज्ञानापासून मुक्त करतो, आणि पवित्र बनवतो, आणि एका सत्य विश्वासाद्वारे तिला येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात ठेवतो. ह्या ख्रिस्ती चर्चमध्ये तो मला व सर्व विश्वासू लोकांना दररोज घडणाऱ्या पापांबद्दल दयाळूपणे क्षमा करतो; आणि शेवटच्या दिवशी तो आम्हा सर्वांना मृत्यूतून उठवेल, आणि मला व ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना शाश्वत जीवन देईल. हे नक्कीच सत्य आहे.

III. प्रभूची प्रार्थना

The Lord’s Prayer

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हे सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकवले पाहिजे?

हे आमच्या स्वर्गातील पित्या

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

ईश्वर आपल्याला ह्या लहानशा प्रस्तावनेमध्ये प्रेमळपणे बोलवतो ज्यामध्ये तो आपल्याला विश्वास ठेवण्यास सांगतो की तो आपला खरा पिता आहे, आणि आपण त्याची खरी मुले आहोत, जेणेकरून प्रिय मुले ज्या विश्वासाने त्यांच्या पालकांकडे काही मागतात त्याचप्रमाणे आपण देखील पूर्ण निष्ठेने अधिक विश्वासाने त्याला साद घालू.

पहिली याचना

तुझे नाव पवित्र मानले जावो

याचा अर्थ काय आहे?

उत्तर: 

ईश्वराचे नाव नक्कीच पवित्र आहे; पण आपण ह्या याचनेमध्ये प्रार्थना करतो की ते आपल्यामध्ये देखील पवित्र राहो.

हे कसे साध्य होईल?

उत्तर: 

जेव्हा ईश्वराचे वचन शुद्धपणे व प्रामाणिकपणे शिकवले जाते, आणि ईश्वराच्या मुलांनी ज्याप्रमाणे जगले पाहिजे तसेच आपण देखील या वचना नुसार पवित्र आयुष्य जगतो. हे स्वर्गातील पित्या, असेच होईल यासाठी आशीर्वाद द्या, आणि आम्हाला मदत करा! परंतु जो कोणी ईश्वराच्या वचनाच्या विरुद्ध शिकवतो किंवा आयुष्य जगतो तो आपल्यामध्ये ईश्वराचे नाव अपवित्र करतो. परंतु असे होऊ देऊ नका हे स्वर्गातील पित्या, असे होण्यापासून थांबवा!

दुसरी याचना

तुझे राज्य येवो

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

ईश्वराचे राज्य आमच्या प्रार्थनेशिवाय सुद्धा येते, स्वतःहून; पण ह्या याचनेमध्ये आपण प्रार्थना करतो की ते आमच्यापर्यंत सुद्धा येवो.   

हे कसे साध्य होईल?

उत्तर:

जेव्हा आपले स्वर्गातील पिता आपल्याला त्यांचा पवित्र आत्मा देतात, की त्याच्या कृपेने आपण त्याच्या पवित्र वचनावर विश्वास ठेवू, आणि इथे व यानंतर अनंतकाळ पर्यंत धार्मिक जीवन जगू.

तिसरी याचना 

जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

देवाची चांगली व दयाळू इच्छा आपल्या प्रार्थनेशिवाय देखील होऊ शकते; पण या याचनेमध्ये आपण प्रार्थना करतो की ती आपल्यापर्यंत देखील येवो.

हे कसे साध्य होईल?

उत्तर:

जेव्हा सैतानाच्या, जगाच्या आणि आपल्या देहाच्या वाईट इच्छेप्रमाणे, प्रत्येक वाईट योजना, इच्छा आणि प्रयत्न ईश्वर हाणून पाडतो व थोपवतो, ज्या आपल्याला देवाचे नाव पवित्र करण्यापासून थांबवतात, आणि त्याचे राज्य आपल्यापर्यंत येण्यापासून रोखतात; आणि मग तो आपल्याला सामर्थ्यवान बनवून आपल्याला त्याच्या वचनावर खंबीर ठेवतात आणि आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत विश्वासात ठेवतात. हे त्याच्या चांगल्या आणि दयाळू इच्छेमुळे होते.

चौथी याचना

आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. 

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

ईश्वर नक्कीच दररोज सर्वांना भाकर देतो, आपल्या प्रार्थनेशिवाय सुद्धा, अगदी दुष्ट माणसांना देखील; पण आपण ह्या याचनेमध्ये प्रार्थना करतो की आपण ह्या आशीर्वादाचा स्वीकार करूया, आणि म्हणूनच आभार मानून दररोजची भाकर मिळवूया.  

रोजच्या भाकरीचा अर्थ काय आहे?

उत्तर:

याचा अर्थ आहे की आपल्या जीवनाच्या गरजा व रक्षण यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी, जसे की अन्न, पेय, कपडे, चपला, घर, निवारा, शेत, गुरे, पैसा, धन, चांगली पत्नी, चांगली मुळे, प्रामाणिक नोकर, प्रामाणिक व विश्वासू मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी), स्थिर सरकार, चांगले हवामान, शांतता, स्वास्थ्य, शिस्त, सन्मान, चांगले मित्र, विश्वासू शेजारी, आणि अश्या अनेक गोष्टी.

पाचवी याचना 

आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

आपण ह्या याचनेमध्ये मागतो की स्वर्गातील आपल्या पिताने आपल्या पापांची परीक्षण आणि तपासणी करू नये, आणि त्यांच्यामुळे आपल्या प्रार्थना अस्वीकार करू नयेत; कारण आपण मागत असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण पात्र नाही, आणि आपण त्या कमवू देखील शकत नाही. परंतु, आपण मागतो की त्याच्या दयाळूपणा व चांगुलपणामुळे तो आपल्याला ह्या सर्व गोष्टी देण्यास तयार होईल; कारण दररोज आपण अनेक प्रकारची पापे करत असतो आणि खरोखरच आपण शिक्षेशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी पात्र नाही.

सहावी याचना

आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

ईश्वर खरेतर कोणालाही मोहात पाडत नाही. परंतु आपण ह्या याचनेमध्ये प्रार्थना करतो की ईश्वर आपले रक्षण करेल व आपल्याला सुरक्षित ठेवेल, जेणेकरून सैतान, जग आणि आपले शरीर आपल्याला फसवून किंवा भुरळ पाडून खऱ्या विश्वासापासून दूर करणार नाही आणि आपल्याला अंधश्रद्धा, अविश्वास, निराशा आणि इतर मोठे अपराध व दुष्कृत्यांच्या दिशेने ढकलू शकणार नाही; आणि विशेषतः जेव्हा आपण अश्या लोभांनी ग्रस्त असतो तेव्हा आपला पराभव होणार नाही, तर अखेरीस आपण यांना पराजित करून त्यांच्यावर विजय मिळवू शकू.

सातवी याचना

पण आम्हाला वाइटापासून सोडव

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

सारांशाप्रमाणे, ह्या याचनेमध्ये आपण प्रार्थना करतो की स्वर्गातील आपला पिता आपल्याला शरीराच्या व आत्म्याच्या सर्व दुष्टपणा व संकटांपासून वाचवून चांगलेपणा आणि सन्मान देईल, आणि शेवटी, जेव्हा मृत्यूची वेळ येईल, तो आपल्या जीवनाचा शेवट सुखात करेल, आणि त्याच्या दयाळू चांगुलपणामुळे आपल्याला अश्रूंच्या ह्या दरीतून त्याच्यासोबत स्वर्गात घेऊन जाईल.  

कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत.

आमेन.

याचा अर्थ काय आहे?

उत्तर:

‘आमेन’ म्हणजे मला याची खात्री असली पाहिजे की स्वर्गातील आपल्या पित्याला ह्या याचना स्वीकार आहेत आणि त्याने ह्या ऐकल्या आहेत; कारण त्याने स्वतःच आपल्याला अशाप्रकारे प्रार्थना करण्याची आज्ञा केली आहे, आणि तो आपले ऐकेल असे वचन दिले आहे. ‘आमेन, आमेन’, म्हणजे: ‘खरचं, नक्कीच, असे घडो.’

IV. पवित्र बाप्तिस्मा संस्कार

The Sacrament of Holy Baptism

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हे सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकवले पाहिजे?

प्रथम

बाप्तिस्मा म्हणजे काय?

उत्तर:

बाप्तिस्मा म्हणजे फक्त साधे पाणी नव्हे तर हे ईश्वराच्या आज्ञेचा अंतर्भाव केलेले आणि ईश्वराच्या वचनाशी निगडीत पाणी असते. 

ईश्वराचे वचन म्हणजे काय आहे? 

उत्तर:

मत्तय 28:19 मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले आहे:

 ‘म्हणून जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.’

द्वितीय

बाप्तिस्मा देतो किंवा यामुळे काय लाभ होतो?

उत्तर:

यामुळे पापांची क्षमा मिळते, मृत्यू आणि सैतान यांच्या पासून सुटका होते, आणि जे यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना शाश्वत मोक्ष प्राप्त होतो, जसे ईश्वराने दिलेले शब्द आणि वचन जाहीर करतात.

देवाचे ते शब्द आणि वचने कोणती आहेत?

उत्तर:

मार्क 16:16 मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले आहे:

 ‘जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाहीत तो शिक्षेस पात्र ठरेल.’

तृतीय

पाणी अशा महान गोष्टी कसे करू शकते?

उत्तर:

पाणी नक्कीच अशा महान गोष्टी करू शकत नाही, पण ईश्वराचे वचन जे पाण्यामध्ये आणि पाण्यासोबत आहे; विश्वास जो पाण्यामधील ईश्वराच्या वचनावर ठेवलेला आहे ते ह्या गोष्टी करतात. कारण ईश्वराच्या वचनाशिवाय पाणी हे फक्त पाणी आणि, बाप्तिस्मा नाही. पण ईश्वराच्या वचनामुळे हे बाप्तिस्मा होते, जीवनातील दयाळू पाणी आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने नव्या जन्माचे स्नान असते, जसे सेंट पॉल तीत 3:4-7 मध्ये सांगतात:

‘परंतु जेव्हा आपल्याला तारणारा ईश्वर ह्याची दया आणी मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले, त्याने तो आत्मा आपल्याला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे.’

चतुर्थ

पाण्याद्वारे केला जाणारा बाप्तिस्मा काय दर्शवतो?

उत्तर:

हा दर्शवतो की आपल्यामध्ये अजूनही असलेल्या जुन्या आदमला, दररोजच्या इंद्रियदमन आणि पश्चात्तापाच्या मार्गाने, सर्व पाप आणि वाईट इच्छांसह बुडवला पाहिजे आणि मारला पाहिजे, आणि पुन्हा दररोज नवीन मनुष्य पुढे आला पाहिजे आणि उठला पाहिजे, आणि देवासमोर प्रामाणिकपणे आणि धार्मिकपणे कायम जगला पाहिजे.

असे कोठे लिहिले आहे?

उत्तर:

सेंट पॉल ने रोमकरांस 6:4 मध्ये सांगितले आहे:

 ‘म्हणून आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.’

V. कबुलीजबाब

Confession

सध्या लोकांना याबद्दल सूचना कशी द्यावी.

कबुलीजबाब म्हणजे काय?

उत्तर:

कबुलीजवाब मध्ये दोन भाग असतात: पहिला आहे पापाची कबुली, आणि दुसरा आहे गॉस्पेलच्या कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकाकडून किंवा उपदेशकाकडून मुक्ती किंवा क्षमा प्राप्त करणे, जसे की तुम्ही खुद्द देवाकडून क्षमा मागत आहात, कोणतीही शंका न घेता, दृढपणे विश्वास ठेवून की स्वर्गातील ईश्वराकडून माफी घेऊन पापांची क्षमा मिळवता येते.

आपण कसला कबुलीजबाब दिला पाहिजे?

उत्तर:

ईश्वरासमोर आपण सर्व पापांची कबुली द्यावी, जी आपल्याला माहित नाहीत त्या पापांची सुद्धा, जसे आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये देतो. परंतु, कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकासमोर, आपण केवळ त्या पापांची कबुली दिली पाहिजे जी आपल्याला माहित आहेत, आणि जी आपल्याला मनापासून मान्य आहेत.    

ते काय आहेत 

उत्तर:

इथे प्रत्येकाने दहा आज्ञांनुसार, जीवनातील त्याच्या स्थानाचा विचार केला पाहिजे: भले ही तुम्ही पिता, माता, पुत्र, पुत्री, घराचा मालक किंवा मालकीण, किंवा नोकर असो; भले ही तुम्ही आज्ञा न मानणारे, अविश्वासू किंवा दुर्लक्ष करणारे असो; भले ही तुम्ही तुमच्या शब्दाने किंवा कृतीने कोणाला दुखावले असो; भले ही तुम्ही चोरी केली असो, दुर्लक्ष केले असो किंवा काही वाया घालवले असो, किंवा कोणालाही कोणतीही इजा केली असो.

कबुलीजबाबाचे एक छोटेसे स्वरूप

साध्या लोकांसाठी 

तुम्ही कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकासोबत असे बोलले पाहिजे:

सन्माननीय फादर, मी तुम्हाला माझ्या पापाचा कबुलीजबाब ऐकण्याची आणि देवासाठी मला क्षमा करण्याची विनंती करतो.

पुढे बोला:

मी, एक गरीब पापी, ईश्वरासमोर असे कबूल करतो की मी सर्व पापांसाठी दोषी आहे; विशेषतः मी तुमच्यासमोर कबूल करतो की मी एक गुलाम (किंवा मोलकरीण, इत्यादी) आहे, पण मी माझ्या मालकाची सेवा अविश्वासाने करत आहे; मी काही कामे करत नाही, त्याने हुकुम दिलेली कामे मी करत नाही; मी त्यांना राग दिला आहे आणि त्यांना अपशब्द वापरण्यास भाग पाडले आहे; मी बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे, आणि नुकसान केले आहे (इत्यादी); माझे शब्द आणि कृती निर्लज्ज आहे, मी उतावळा होतो, मी माझ्या बरोबरीच्या लोकांसोबत भाद्लो, मी माझ्या घरातील स्त्रीकडे तक्रार केली आणि अपशब्द वापरले (इत्यादी). या सर्वांसाठी मी दिलगीर आहे आणि मी कृपेची विनवणी करतो. मला चांगले कार्य करायचे आहे.

घराचा मालक किंवा मालकीण असे बोलू शकतात: 

मी तुमच्यासमोर विशेषतः कबूल करतो की मी माझ्या कुटुंबास – माझी पत्नी, मुले, आणि नोकर – ईश्वराची कीर्ती विश्वासूपणे शिकवण्यात आणि प्रशिक्षण देण्यात मेहनत घेतली नाही; मी अपशब्द वापरले; मी ईश्वराच्या नावाचा गैरवापर केला; मी असभ्य शब्द आणि कृतींद्वारे वाईट आदर्श समोर ठेवला; मी माझ्या शेजाऱ्यांना त्रास दिला, आणि त्यांना अनेक प्रकारे इजा पोहचवली; मी खोटे वजन आणि मापे वापरली; मी माझ्या शेजाऱ्याला सामान विकताना फसवले.

आणि प्रत्येक व्यक्तीच्या कामधंद्यामध्ये ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध जे काही घडले असेल ते त्यांना कबुल करू द्या.

पण जर एखाद्याला असे तो अशा पापांचे किंवा याहून अधिक तीव्र पापांचे ओझे वाटत नसेल, तर त्याने याबद्दल चिंता करू नये, किंवा इतर पापे शोधू नयेत आणि निर्माण करू नयेत, आणि असे करून कबुलीजबाबाची छळणूक करू नये, तर त्याला माहित असलेली एक-दोन पापे सांगावीत, जसे की: की विशेषतः असे कबूल करतो की मी देवाच्या नावाचा एकदा गैरवापर केला होता; मी पुन्हा एकदा अयोग्य शब्द वापरला होता; मी एकदा एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते, इत्यादी. हे पुरेसे असू द्या, आणि अशाप्रकारे आत्म्याला शांती मिळू द्या. 

परंतु जर तुम्हाला काहीच माहित नसेल (जे व्यावहारीक दृष्ट्या अशक्य आहे), तर तुम्ही सुद्धा विशेषतः कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करू नये, तर सामान्य कबुलीजबाबानंतर क्षमा प्राप्त केली पाहिजे, जी तुम्ही ईश्वराच्या उपस्थितीत कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकासमोर सांगितली आहेत.

मग कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकाने म्हटले पाहिजे: 

ईश्वर तुमच्यावर दया करो आणि तुमचा विश्वास बळकट करो. आमेन.

त्याने कबुलीजबाब देणाऱ्या व्यक्तीला हे देखील विचारले पाहिजे:

माझी क्षमा म्हणजे ईश्वराची क्षमा आहे यावर तुझा विश्वास आहे का?

उत्तर:

होय, फादर.

नंतर स्वीकार करणाऱ्या विश्वासूला तो म्हणेल: 

तुझा विश्वास असल्याप्रमाणे तुझ्यासोबत होऊ दे. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुला तुझ्या पापांसाठी क्षमा करतो. आमेन. शांतचित्ताने निघा.

जे लोक सदसदविवेकबुद्धी, मोह, किंवा निराशेने अत्यंत दुःखी आहेत, कबुली घेणाऱ्या धर्मोपदेशकाला पवित्र ग्रंथामधील अजून काही परिच्छेदांच्या सहाय्याने त्याला दिलासा कसा द्यावा हे माहित असेल, जेणेकरून त्यांचा विश्वास वाढण्यास सहाय्य होईल. आता नुकत्याच सांगितलेल्या स्वरूपाचा कबुलीजबाब हा साध्या, अशिक्षित लोकांसाठी असलेला पोरकट, सामान्य स्वरूपाचा आहे.

VI. पवित्र वेदीचा धार्मिक विधी

The Sacrament of the Altar

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हे ज्या सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकवले पाहिजे.

पवित्र वेदीचा धार्मिक विधी म्हणजे काय?

पवित्र वेदीचा धार्मिक विधी म्हणजे भाकर आणि वाईनच्या स्वरुपात, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वास्तविक शरीर आणि रक्त आहे, जे ख्रिस्ताने स्वतः स्थापित केलेलं आहे.

असे कोठे लिहिले आहे? 

उत्तर:

पवित्र सुवार्तिक (मत्तय 26:26, मार्क 14:22, लूक 22:19), आणि सेंट पॉल (1 करिंथकरांस . 11:23), खालीलप्रमाणे लिहितात:

ज्या रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली, आणि शिष्यांना देऊन तो म्हणाला, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे, जे तुमच्यासाठी दिले गेले आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.”

त्याचप्रमाणे, रात्रीचे भोजन झाल्यांनतर, त्याने प्याला घेतला आणि आभार मानून झाल्यांनतर, त्याने तो त्यांना दिला आणि म्हटले, “घ्या, तुम्ही सर्वांनी ह्यातून प्या. हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, जे तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी ओतले जात आहे. माझ्या आठवणीसाठी, तुम्ही जितक्या वेळा पिता तितक्या वेळा हे करा.”

पण अशा प्रकारच्या खाण्याचे आणि पिण्याचे लाभ काय आहेत?

उत्तर:

हे आपल्याला ह्या शब्दांनी सूचित केले आहे: ‘दिलेले, आणि तुमच्यासाठी ओतलेले, पापांची क्षमा करण्यासाठी’; म्हणजेच धार्मिक विधीमधील ह्या शब्दांद्वारे आपल्याला पापांची क्षमा, आयुष्य, आणि मोक्ष देण्यात आले आहे. कारण जिथे पापांची क्षमा आहे तिथे आयुष्य आणि मोक्ष देखील आहे. 

शरीरासाठी खाणे आणि पिणे अशा महान गोष्टी कशा करू शकतात?

उत्तर:

खाणे आणि पिणे यामुळे अशा गोष्टी नक्कीच साध्य होत नाहीत, परंतु येथे दिलेले शब्द, म्हणजे, ‘दिलेले, आणि तुमच्यासाठी ओतलेले, पापांची क्षमा करण्यासाठी’ हे साध्य करतात. हे शब्द व त्यासोबत शरीराचे खाणे आणि पिणे, हे या संस्काराचे केंद्र आणि सार आहेत; आणि जो ह्या शब्दांवर विश्वास ठेवतो त्याच्याकडे हे शब्द जे सांगतात आणि व्यक्त करतात ते आहे, म्हणजे पापांची क्षमा आहे.

मग, ह्या धार्मिक विधींना योग्यप्रकारे प्राप्त किंवा यांचा उपयोग कोन करतो?

उत्तर:

उपवास करणे आणि एखाद्याच्या शरीरास तयार करणे हे नक्कीच चांगली बाह्य प्रशिक्षण आहे. पण ज्याला ‘दिलेले, आणि तुमच्यासाठी ओतलेले, पापांची क्षमा करण्यासाठी’ ह्या शब्दांवर विश्वास आहे तो खरोखरच योग्य आणि चांगल्याप्रकारे तयार आहे.

पण ज्याला ह्या शब्दांवर विश्वास नाही, किंवा जो यांच्यावर शंका घेतो, तो अयोग्य आणि तयार नाही, कारण ‘तुमच्यासाठी’ या शब्दांवर प्रत्येक हृदयात विश्वास असला पाहिजे.

दैनंदिन प्रार्थना 

Daily Prayers

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करायला कशाप्रकारे शिकवले पाहिजे?

सकाळची प्रार्थना

Morning Prayer

सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तुम्ही स्वतः पवित्र क्रूसचा आशीर्वाद घ्या आणि म्हणा:

देव पिता, आणि पुत्र, आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. आमेन.

नंतर, गुडघ्यावर बसून किंवा उभे राहून, नितीसुत्रे आणि प्रभूची प्रार्थना म्हणा. जर तुमची इच्छा असेल, तर याव्यतिरिक्त तुम्ही ही लहानशी प्रार्थना देखील म्हणू शकता. 

हे माझ्या स्वर्गातील पित्या, आपला प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे, मी आपले आभार मानतो की तुम्ही मला ह्या रात्री सर्व प्रकारच्या हानी आणि धोक्यापासून दूर ठेवले आहे; आणि मी प्रार्थना करतो, की मला आजच्या दिवस पाप आणि सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेव, जेणेकरून माझी सर्व कृत्ये आणि आयुष्य तुला आनंदित करतील. कारण मी स्वतःला, माझ्या शरीराला आणि आत्म्याला, आणि सर्व गोष्टींना तुझ्या हाती सोपवत आहे. तुझे पवित्र दूत माझ्या सोबत राहो, जेणेकरून वाईट शत्रूंचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडू नये. आमेन.      

त्यानंतर आनंदाने, दहा आज्ञा किंवा तुमची भक्ती तुम्हाला सुचवेल त्याप्रमाणे, स्त्रोत म्हणत आपल्या कामावर जा.

संध्याकाळची प्रार्थना

Evening Prayer

संध्याकाळी, जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तेव्हा तुम्ही स्वतः पवित्र क्रूसचा आशीर्वाद घ्या आणि म्हणा:

देव पिता, आणि पुत्र, आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. आमेन.

नंतर, गुडघ्यावर बसून किंवा उभे राहून, नितीसुत्रे आणि प्रभूची प्रार्थना म्हणा. जर तुमची इच्छा असेल, तर याव्यतिरिक्त तुम्ही ही लहानशी प्रार्थना देखील म्हणू शकता. 

हे माझ्या स्वर्गातील पित्या, आपला प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे, मी आपले आभार मानतो की तुम्ही दिवसभर माझ्यावर द्या केली आहे; आणि मी प्रार्थना करतो, की मी जे काही चुकीचे केले आहे त्यासाठी, माझ्या सर्व पापांसाठी मला क्षमा करा, आणि या रात्री माझ्यावर दया करा. कारण मी स्वतःला, माझ्या शरीराला आणि आत्म्याला, आणि सर्व गोष्टींना तुझ्या हाती सोपवत आहे. तुझे पवित्र दूत माझ्या सोबत राहो, जेणेकरून वाईट शत्रूंचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडू नये. आमेन.

नंतर लगेचच आनंदाने झोपा.

घराच्या प्रमुखाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना आशीर्वाद मागण्यास आणि आभार मानायला कशाप्रकारे शिकवले पाहिजे?

आशीर्वाद मागणे 

मुलांनी आणि नोकरांनी आदराने आणि हात जोडून टेबलाजवळ जावे आणि म्हणावे:

हे प्रभू, सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस; तू आपली मूठ उघडतोस, आणि सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस.

टीप:
‘इच्छा पूर्ण करणे’ म्हणजे सगळ्या प्राण्यांना इतके खाण्यास मिळते की ते यामुळे सुखी आणि आनंदी असतील; काळजी आणि हाव ह्या समाधानामध्ये अडथळा आणू शकत नाही.

नंतर प्रभूची प्रार्थना आणि निम्नलिखित प्रार्थना म्हणा:

प्रभू देवा, स्वर्गातील पित्या, आम्हाला आणि या तुझ्या भेटवस्तूंना आशीर्वाद द्या, ज्या तुमच्या उदार दयाळूपणामुळे, आमचा प्रभू, येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला मिळतात. आमेन.

आभार मानणे

त्याचप्रमाणे जेवणानंतर देखील त्यांनी हात जोडावे आणि आदराने म्हणावे:

प्रभूचे आभार माना, कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सदैव रहाते. तो सर्व जीवांना अन्न देतो; तो प्राण्यांना आणि रडणाऱ्या लहान डोंबकावळ्यांना त्यांचे अन्न देतो. त्याला घोड्याच्या शक्तीचा आनंद होत नाही; तर माणसाच्या पायांमुळे आनंद होतो. जे लोक त्याला भितात, जे त्याच्या कृपेची आशा करतात त्यांद्वारे आनंद घेतो. 

नंतर प्रभूची प्रार्थना आणि निम्नलिखित प्रार्थना म्हणा:

प्रभू देवा, आमच्या पित्या, सर्वकाळ जगणाऱ्या आणि राज्य करणाऱ्या, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिलेल्या सर्व लाभांसाठी आम्ही तुझे आभार मानतो.

कर्तव्यांची सारणी

Table of Duties

विविध पवित्र आज्ञा आणि पदांसाठी, पवित्र ग्रंथातील काही परिच्छेद त्यांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबद्दल सौम्य भाषेत कान उघाडणी करतात.

बिशप, चर्चमधील मुख्य धर्मोपदेशक, आणि उपदेशक यांच्यासाठी

‘बिशपअदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त,सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा; तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा,आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा (कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील?); त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. त्याचप्रमाणे, त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.’ 1 तीमथ्याला 3:2-7.

‘बिशपअदूष्यअसावा,देवाचा कारभारी म्हणून, स्वतःची इच्छा बाळगणारा नसावा, लवकर रागवणारा नसावा, तो मद्यपी व मारका नसावा, द्रव्यलोभ न धरणारा,अतिथिप्रिय, चांगल्या गोष्टींना प्रिय मानणारा, स्वस्थचित्त, केवळ पवित्र, आत्मसंयमी, त्याला शिकवलेल्या विश्वासू वचनांना पाळणारा, जेणेकरून विरुद्ध असलेल्या व्यक्तींना, दृढ शिकवणीद्वारे तो आग्रहाने सांगण्यात व दोषी ठरवण्यात सक्षम असेल.’ तीमथ्याला 1:7-9.

श्रोते त्यांच्या मुख्य धर्मोपदेशकांचे काय देणे लागतात.

‘त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी.’ 1 करिंथकरांस 9:14.

‘ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.’ गलतीकरांस 6:6.

‘जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत. कारण शास्त्र म्हणते, “बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नकोस,” आणि “कामकर्‍याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.”’ 1 तीमथ्याला 5:17-18. 

‘आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात;ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.’ इब्री लोकांस 13:17-18.

नागरी सरकार संबंधित 

 ‘प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकार्‍यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्‍याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल;कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्‍याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.’ रोमकरांस 13:1-4.

मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी) यांच्याकडे कोणते विषय आहेत

‘तर मग सीझर ते सीझरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.’ मत्तय 22:21.

‘म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.’ रोमकरांस 13:5-7.

‘तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी;राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.’ 1 तीमथ्याला 2:1-2.

‘त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे;कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे.’ तीताला 3:1-2.

‘प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन;आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.’ 1 पेत्र 2:13-15.

पतींसाठी

‘पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.’ 1 पेत्र 3:7.

‘पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.’ कलस्सेकरांस 3:19.

पत्नींसाठी

‘स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा.’ इफिसकरांस 5:22.

‘तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा …. जशी सारा अब्राहामाला ‘धनी म्हणून’ त्याच्या आज्ञेत राहिली; तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिच्या मुली झाला आहात.’ 1 पेत्र  3:1, 6.

पालकांसाठी

‘बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.’ इफिसकरांस 6:4.

मुलांसाठी

‘मुलांनो,प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख,” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे “ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.”’ इफिसकरांस 6:1-3.

पुरुष आणि महिला नोकर, नोकरीवर ठेवलेले पुरुष, आणि मजुर

‘दासांनो,आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;माणसांना खूश करणार्‍या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणार्‍या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा;कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.’ इफिसकरांस 6:5-8. 

कलस्सेकरांस  3:22-24 देखील पहा.

मालक आणि मालकिणीसाठी

‘आणि तुम्ही, धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा; व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.’ इफिसकरांस 6:9.

‘धन्यांनो, तुम्हांलाही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.’ कलस्सेकरांस 4:1.

सामान्य तरुण लोकांसाठी

‘तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हाला उच्च करावे.’ 1 पेत्र 5:5-6.

विधवांसाठी

 ‘जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.’ 1 तीमथ्याला 5:5-6.

सर्वांसाठी सामान्य 

‘एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण “व्यभिचार करू नकोस,खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे.’ रोमकरांस 13:8-9.

‘तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या,प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी.’ 1 तीमाथ्याला 2:1

त्याचा प्रत्येक धडा काळजीपूर्वक शिकवा,

आणि घरातील सर्वांचे चांगले होईल.